सिल्लोड, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज घोषित करण्यान्याची मागणी केली आहे. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिल्लोड, सोयगाव तसेच कन्नड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
सोयगाव, कन्नड, सिल्लोड, तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके, घरे व जनावरांचेही प्रचंड हानी झाली आहे. शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी रविवारी (दि. २१) सोयगाव तालुक्यातील बोरमाळ व घोसला या गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
शेतकऱ्यांवर आलेले हे संकट अत्यंत मोठे आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. प्रत्यक्ष नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली पाहिजे. सोयगाव तालुक्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच आमची ठाम मागणी आहे.
पाहणी दरम्यान स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आपली व्यथा मांडत तातडीने मदतीची मागणी केली. दानवे यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या कठीण काळात त्यांच्या पाठीशी आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या
या नुकसानीकडे सरकारने दुर्लक्ष करू नये.
शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती व पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना करावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला. याप्रसंगी माजी आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर पाटील, तालुकाप्रमुख संजय मोटे, दिलीप मचे, निरीक्षक दिग्विजय शेरखाने व रामेश्वर काळे उपस्थित होते.